सांगली - जिल्ह्यातील 24 जणांचे घशातील द्राव (स्वॅब टेस्ट) चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. बुधवारी 4 तर आज सकाळी 20 जणांचे स्वॅब पाठवण्यात आले असून, आज रात्री उशिरा पर्यंत सर्वांचे नमुने प्राप्त होतील, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले आहे. सांगलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणखी किती वाढणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून कोरोनाचा आकडा स्थिर आहे. आतापर्यंत 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून वाढणारा हा आकडा गेल्या पाच दिवसांसून स्थिर झाला आहे. तरीही प्रशासनाकडून सर्व पातळ्यांवर खबरदारी घेण्यात येत आहे.तर दिल्लीच्या मर्कझ येथील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबध आलेले 11 जण सांगली जिल्ह्यात आढळून आले. त्यामुळे प्रशासन हादरून गेले आहे. या सर्व 11 जणांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये दाखल करण्यात आले असून, बुधवारी यापैकी ४ जणांचे स्वॅब पाठवण्यात आले होते. तर गुरुवारी आणखी 20 जणांचे स्वॅब टेस्ट पाठवण्यात आले आहेत.
सध्या मिरजेच्या कोरोना रुग्णालयात 25 जणांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंखे यांनी सांगितले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सांगलीच्या इस्लामपूरमधील कोरानाचा आकडा वाढला नसून स्थिर आहे. मात्र, आता तब्बल 24 जणांचे स्वॅब टेस्टसाठी पाठवण्यात आलेले आहेत आणि रात्री उशिरापर्यंत त्यांचे रिपोर्ट प्राप्त होणार आहेत. त्यामुळे हे रिपोर्ट निगेटिव्ह येतात की पॉझिटिव्ह येतात त्यावर जिल्ह्यातल्या रुग्णांचा आकडा वाढणार की स्थिर राहणार, हे स्पष्ट होणार आहे.