सांगली - रविवारी दिवसभरात जिल्ह्यात आठ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मुंबईहुन आलेल्या ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दुपारी ४ आणि रात्री ४ असे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील ७ जणांचा तर मुंबईहुन मालगावपर्यंत प्रवास केलेल्या १ अशा आठ जणांना लागण झाली आहे. तर दिवसभरात ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा ३४ झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईवरून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. रविवारी आष्टाच्या झोळंबी, शिराळ्याच्या मोरगाव, कवठेमहांकाळ येथील नांगोळे आणि आटपाडीच्या जांभुळणी येथील चौघांनी कोरोनाची लागण झाली होती. तर रात्री उशिरा मुंबईहुन आलेल्या आणखी चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ज्यामध्ये मुंबईहुन आलेल्या तिघांचा तर मुंबईहुन आलेल्या बाधिताच्या संपर्कातील एकाचा समावेश आहे.
आटपाडीच्या बनपुरी, शिराळ्याच्या खिरवडे, कवठेमहांकाळच्या नांगोळे येथे आलेल्या येथील व्यक्ती आणि धारावी ते मिरजचे मालगाव असा बस प्रवास केलेली एक महिला अशा चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील नांगोळे येथील १२ वर्षीय कोरोना बाधीत मुलाच्या वडिलांना दुपारी कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते. तर रात्री त्यांच्या दुसर्या मुलाला कोरोना झाल्याचा अहवाल आला आहे.
दरम्यान मुंबईच्या धारावीतून एका बसने मिरजेच्या मालगावमध्ये पोहचलेल्या २२ जणांना शनिवारी क्वारंटाईन करत स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी २० जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले असून एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शिराळा तालुक्यातील खिरवडे येथे मुंबईवरून आलेल्या एका ५७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर आटपाडीच्या बनपुरी मध्ये मुंबईहुन आलेल्या १५ वर्षीय मुलाला कोरोना लागण झाली आहे.
रविवारी ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईहुन कडेगाव तालुक्यातील भिकवडीत आलेले दोन तर जत तालुक्यातील अंकले येथे मुंबईहून आलेला एक या तिघांना उपचारानंतर इन्स्टिट्यूशनल क्वारटाईन केले आहे.
रविवारी दिवसभरात आठ नवे कोरोना रुग्ण आढळले तर तिघे कोरोनामुक्त झाल्याने सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३४ वर पोहचली आहे. जिल्हा अधिकारी अभिजित चौधरी आणि कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंके यांनी ही माहिती दिली आहे.