सांगली - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून सांगली मध्ये उभारण्यात येणाऱ्या कोरोना सेंटरला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. पालिकेच्या वतीने 'वानलेसवाडी' येथे सेंटर उभारण्यात येणार आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनी काही लोकांसाठी तुम्ही हजारो लोकांचा जीव धोक्यात घालणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात आणि पालिका क्षेत्रात कोरोना संशयित रुग्णांच्या उपचारासाठी सेंटर उभे करण्यात येत आहे. सांगली महापालिकेच्यावतीने सांगली-मिरज रस्त्यावरील 'वानलेसवाडी' या ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, येथील सेंटरला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. येथील नागरिकांनी एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवला आहे.
लोकवस्ती आणि टीबीचे हॉस्पिटल असल्याने येथे अशा प्रकारचे सेंटर उभारू नये, असा आक्रमक पावित्रा लोकांनी घेतला आहे. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणाव निर्माण झाला. यानंतर घटनास्थळी सांगली महापालिका आयुक्त, पोलीस आणि भारती हॉस्पिटलचे अधिष्ठाता दाखल झाले आणि नागरिकांची समजूत काढण्यात प्रयत्न केला. पण कोणत्याही परिस्थितीत याठिकाणी कोरोना संशयित उपचार सेंटर उभा करू देणार नसल्याची भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.
हेही वाचा - दुबईहून तेलंगणात परतलेला 'तो' रुग्ण कोरोना निगेटीव्ह, दहा दिवसांपूर्वी होता पॉझिटीव्ह