सांगली - पावसाळाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनासह महानगरपालिका प्रशासनही पूरपरिस्थितीला तोंड देण्यास सज्ज झाले आहे. सांगली महापालिकेकडून संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर शहरातून आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा दर्शवणारी प्रबोधन फेरी काढण्यात आली. या माध्यमातून आपत्कालीन वाहनासहीत पालिकेची पूरसदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी असलेल्या सज्जतेचे दर्शन नागरिकांना करून देण्यात आले. यावेळी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पूर पट्ट्यातील नागरिकांना करण्यात आले.
संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन सांगली महापालिका प्रशासनाने पूर आपत्ती यंत्रणा सज्ज केली आहे. या पार्श्वभूमीवर सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने रविवारी आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत आपत्ती, सुरक्षा, बचाव, सुटका पथकाची सर्व साधन सामुग्री/यंत्रणा,आपत्ती मित्र यांची प्रबोधन फेरी काढण्यात आली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी या प्रबोधन फेरीचे नेतृत्व केले.
मिरज शहरातून सुरू झालेली रॅली सांगली, मिरज रोडवरून सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ करण्यात आली. या रॅलीवेळी महापालिकेच्या वतीने पूर पट्ट्यातला नागरिकांनी संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन आपले महत्त्वाचे साहित्य आतापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून वेळीच सतर्क व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी पालिका प्रशासनाकडून शहरातील कल्पद्रुम क्रीडांगणावर आपत्कालीन साहित्य आणि तयारीची प्रत्यक्षिकेही सादर करून दाखवण्यात आली.