सांगली - कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. नोकरी गेल्याने अनेकांना रोजंदारीवर मोलमजुरी करण्यासाठी जावे लागत आहे. अगदी पुरस्कारप्राप्त साहित्यिकसुद्धा यातून सुटू शकले नाही. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले युवा लेखक नवनाथ गोरे यांच्यावरही मजूरी करण्याची वेळ आली आहे. 300 ते 400 रुपयांच्या रोजंदारीवर शेतामध्ये मजुरी करण्याची वेळ गोरे यांच्यावर आली आहे.
नवनाथ गोरे यांना 2018 मध्ये त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर लिहिलेल्या 'फेसाटी' या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा 'युवा साहित्यिक' पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कारानंतर नवनाथ गोरे यांच्या आयुष्याला थोडीफार कलाटणी मिळाली. अहमदनगर जिल्ह्यामधील एका शिक्षण संस्थेत त्यांना नोकरी मिळाली. त्यामुळे त्यांच्या मागे लागलेले अठराविश्व दारिद्र्य मिटले. निगडी बुद्रुकमध्ये नवनाथ गोरे एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीत राहतात. लॉकडाऊनमुळे ते गावी परतले तशी त्यांची नोकरी सुटली. लॉकडाऊनमध्ये जगण्याचा प्रश्न होता, आर्थिक स्थिती बिकट होऊ लागली, आता करायचे काय? असा प्रश्न त्यांना पडला. शेतात मजुरी करण्याशिवाय गोरे यांच्यासमोर पर्याय नव्हता, त्यामुळे त्यांनी शेताची वाट धरली.
लॉकडाऊनमुळे नोकरीतून मिळणारा सात ते आठ हजार रुपयांचा पगारही बंद झाला. थोडी शेती आहे त्यात काही पिकत नाही. अशातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि परिस्थिती पुन्हा अवघड बनली. म्हणून आपण मजुरी करण्याचा निर्णय घेतला, असे गोरे यांनी सांगितले.
गोरेंच्या छोट्याशा घरामध्ये त्यांच्या सामानापेक्षा त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचा ढीग जास्त आहे. मात्र, या पुरस्कारांनी त्यांना जो सन्मान मिळाला, तो फार टिकू शकला नाही. नोकरी नसल्याने त्यांना पुन्हा गावात मोलमजुरी करावी लागत आहे. यातून दिवसाला 250 ते 400 रुपये मिळतात. यावरच त्यांचे कुटुंब उदरनिर्वाह करत आहे. गेल्या सात महिन्यांपासून ते केवळ शेतात मजुरीचे काम करत आहेत. या काळात त्यांनी पेनाला हात सुद्धा लावला नाही.
शासनाकडून नवनाथ गोरे यांना केवळ नोकरीची अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने खेळाडूंना शासनाकडून नोकरी मिळते, तशीच एखादी नोकरी साहित्यिक म्हणून आपल्यालाही मिळावी, अशी अपेक्षा गोरे व्यक्त करत आहेत.