सांगली- माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी स्वतःच्या आमदार फंडातून इस्लामपूरमध्ये 20 बेडचे फिरते क्वारंटाइन सेंटर सुरु केले आहे. जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन क्वारंटाइन सेंटरची सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आमदार फंडातून सुरु करण्यात आलेले हे राज्यातील पहिलेच क्वारंटाइन सेंटर आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस आढळून येत आहेत.त्यामुळे जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी असणाऱ्या कोरोना रुग्णालयावर मोठा ताण पडत आहे. मोठया संख्येने कोरोना संशयित रुग्णांना क्वारंटाइन सेंटरची कमतरता जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर याठिकाणी 20 बेडचे क्वारंटाइन सेंटर सुरु केले आहे.
आमदार फंडाच्या माध्यमातून हे क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आले आहे. महाराष्ट्रातला हा पहिलाच उपक्रम सदाभाऊ खोत यांनी सुरु केला आहे.इस्लामपूर या ठिकाणी असणाऱ्या समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत याचे उद्गाटन करण्यात आले. जे कोरोना संशयित व्यक्ती येथे दाखल होतील त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध सामग्री आणि वस्तू सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.दात घासायच्या ब्रश पासून औषधं पर्यंत सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ही सर्व साधनसामुग्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.
राज्यात सगळीकडेच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी याचा मोठा ताण पडत असल्याचे चित्र समोर येत आहे.जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी ग्रामीण भागातल्या कोरोना संशयित रुग्णांना अलगीकरण कक्षात ठेवण्यामध्येही मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. संपूर्ण राज्यभर अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याबाबतीत पुढाकार घेऊन तालुक्याच्या ठिकाणी एक क्वारंटाइन सेंटर सुरु केले पाहिजे,या विचारातून आपल्या आमदार फंडातून फिरते क्वारंटाइन सेंटर उभे केल्याचे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागातल्या नागरिकांना या सेंटरमध्ये ज्या सुविधा आवश्यक आहेत, त्याही मोठ्या प्रमाणात आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्याची आज गरज आहे आणि राज्य सरकारने याबाबतचा उपक्रम हाती घ्यावा,असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
खासगी डॉक्टरांना राज्य सरकारने आता पन्नास लाखांचा विमा जाहीर केला आहे. त्यामुळे इतर रुग्णांच्या बाबतीत ही डॉक्टरांनी किरकोळ आजारांवर उपचार करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. अनेक छोट्यामोठ्या आजारांमुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी उपचार सुरु करावेत,असे आवाहनही खोत यांनी यावेळी केले आहे.
याप्रसंगी प्रांताधिकारी नागेश पाटील, भाजपचे नेते विक्रम भाऊ पाटील, राहुल महाडिक तसेच इस्लामपूर नगरपालिकेचे नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.