सांगली - 'राजू शेट्टी म्हणजे काजू शेट्टी असून या माणसाची अवस्था देवाला सोडलेल्या वळू सारखी'. अशी टीका माजी कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली आहे. सांगलीच्या आटपाडीमधील झरे या ठिकाणी ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजप आणि मित्र पक्षांच्या वतीने आज राज्यभर दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावरून माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महायुतीचे दूध आंदोलन म्हणजे कोंबडी चोरांचे आंदोलन असल्याची टीका त्यांनी केली. याच टीकेला प्रत्युत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी शेट्टींचा खरपूस समाचार घेतला आहे. 'राजू शेट्टी हे आता काजू शेट्टी झाले असून या भंपक माणसाला आता कोणी किंमत देत नाही, तसेच त्यांची अवस्था आता गावात देवाला सोडलेल्या वळूप्रमाणे झालेली आहे. त्यामुळे आता काय करावे आणि काय नाही, हे सूचत नसल्याने राजू शेट्टी यांनी दूध दराच्या आंदोलनाचे नाटक केले आहे'. असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा - ...हे तर आंधळे-बहिरे-मुक्याचे सरकार; सदाभाऊ खोतांची ठाकरे सरकारवर टीका
पुढे बोलताना खोत म्हणाले, 'बारामतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पायी गेलो. त्याच ठिकाणी राजू शेट्टी मात्र आपल्या आमदारकीसाठी पाय चाटायला गेले, मात्र अजूनही राष्ट्रवादीने त्यांना आमदारकी दिलेली नाही, कारण राजू शेट्टी जातील तिथे खंजीर खुपसतात हे त्यांना माहीत आहे'. अशी टीका खोत यांनी केली आहे. तसेच, 'मला कोंबडीचोर म्हणणाऱ्या राजू शेट्टींनी चारशे एकर जमिनी घेऊन ठेवलेली आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना मिळणारे मंत्रीपद राजू शेट्टींना हवे होते. त्यामुळे त्यांनी भुयारांना मंत्री पद मिळू दिले नाही, असा आरोप खोत यांनी केला आहे.
तर मी राजकारणातून सन्यास घेईल -
'राजू शेट्टी म्हणतात केंद्र सरकारने दूध भुकटी आयात केली आहे. मात्र केंद्र सरकारने दूध भुकटी आयात केलेली नाही. एक किलो भुकटी जरी आयात केल्याचे शेट्टी यांनी सिद्ध केल्यास मी राजकारणातून सन्यास घेईल, असा दावा खोत यांनी केला आहे.
हेही वाचा - अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेष : 'एकजुटीचा नेता झाला'