सांगली - 'राजू शेट्टींप्रमाणे मला सरड्या सारखा रंग बदलता येत नाही,' अशा शब्दात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीका केली आहे. तसेच 'आमच्या सारख्या फालतू माणसांमुळेच तुम्ही आमदार आणि खासदार झालात,' असा टोलाही खोत यांनी लगावला. दूध दरावरून सोलापूरमध्ये राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला खोतांनी इस्लामपूरमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिले.
दूध दरावरून महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून राज्यभर आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनादरम्यान सोलापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यावर 'भंपक आणि फालतू माणूस' असल्याची टीका केली होती. या टीकेला प्रतुत्तर देताना खोतांनी राजू शेट्टींवर जोरदार निशाणा साधला आहे.
'कोरोनामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे, शेतकऱ्यांना निकृष्ठ बियाणे मिळाले आहेत, दुधाला दर नाही याशिवाय शेतकऱ्यांना सरासरी 34 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि शेतकरी प्रश्नावर सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. यामुळेच महायुती आंदोलन करत आहे. तर शेतकरी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आली आहे. त्या संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिक लक्ष द्यावे, असे मला वाटते, त्यामुळे स्वाभिमानीच्या संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाधिक महत्त्व द्यावे. आम्ही फालतू माणसं होतो, पण आम्ही फालतू माणसांनी संघटना वाढवली, त्यामुळे तुम्ही आमदार आणि 2 वेळा खासदार होऊ शकला, त्यामुळेच शेतकऱ्यांचे नेते म्हणून तुम्ही राज्यभर फिरू शकला. पण मला त्यांच्या प्रमाणे सरड्यासारखा रंग बदलता येत नाही, मला वाटतं त्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचं असेल तर सदाभाऊंचं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धीच्या झोतात राहू शकत नाही, त्यामुळेच ते अशा प्रकारच्या टीका करतात.' असा आरोप करत खोत म्हणाले, त्यांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा, सदाभाऊ विषयावर आवाज उठवण्यासाठी अजून चार वर्ष बाकी आहेत, 2024ला आपण आमने-सामने येऊ शकतो आणि एकमेकांना उत्तर देऊ शकतो.' असा इशाराही खोत यांनी दिला आहे.
हेही वाचा - वीज कंपन्यांना कर्ज घेण्यासाठी भांडवलाची मर्यादा शिथील; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय