सांगली - मिरज-पंढरपूर मार्गावरील तासगाव फाटा या ठिकाणी शनिवारी मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याचा प्रकार घडला आहे. काही घरांना बाहेरून कड्या घालून रोख रक्कम, मोबाईल, धान्य आणि तेलाचे डबे असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तसेच एका चारचाकी वाहनाची तोडफोड करत महागडा मोबाईल लंपास केला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
परप्रांतीय मजूरांच्या वस्तीत दरोडेखोरांचा धुमाकूळ
मिरज-पंढरपूर रस्त्यावरील तासगाव फाटा याठिकाणी अजंठा प्रिकास्ट कंपनीच्या परप्रांतीय मजुरांची घरे आहेत. याठिकाणी शनिवारी मध्यरात्रीनंतर पाच ते सहा जणांची टोळी दाखल झाली. त्यांनतर एका परप्रांतीय मजुराच्या खोलीत काही जण शिरले. घरात झोपलेल्या मंगल वसोया यांच्यासह पत्नी आणि लहान बालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन बालकाच्या गळ्यातील चांदीची चैन, पायातील पैंजण, सहा हजार रुपये रोख रक्कम तसेच घरातील धान्य आणि तेलाचे डबे व इतर साहित्य घेऊन पसार झाले. दरम्यान या घरावर दरोडा टाकण्याआधी आसपासच्या घरांना दरोडेखोरांनी बाहेरून कड्या लावल्या होत्या.
घटना सीसीटीव्हीत कैद
दरोडेखोरांनी काही अंतरावर जाऊन रस्त्यावरून जाणारी महिंद्रा गाडी अडवून चालकाला चाकूचा धाक दाखवत 40 हजारांचा मोबाईल घेतला. तसेच गाडीवर हल्ला चढवत गाडीची तोडफोड केली. दरोडेखोरांचा सर्व धमाकूळ या ठिकाणी असणाऱ्या कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना केले आहेत.