सांगली - मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात भात, आले, सोयाबीन व भाजीपाला या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. पावसामुळे भातशेतीचे देखील प्रचंड नुकसान होते आहे. सध्या कोरोनामुळे शेतकरी वर्ग देशोधडीला लागला आहे. त्यातच आता अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णतः खचला आहे.
वाळवा येथील शेतकरी किरण महादेव लाड यांचे बारा गुंठे क्षेत्र असून, त्यांनी इंद्रायणी भाताची लागण केली होती. मात्र ऐन सुगीच्या दिवसातच कोरोनामुळे व्यापार बंद झाले होते. दुप्पट दर देऊन लागवडी व औषधे खरेदी करून त्यांनी पिके जगवली होती. यातून बारा पोती भाताची अपेक्षित होती. मात्र पावसाचे पाणी शेतात साचल्याने भात पीक जमीनदोस्त झाले आहे. शेतातील 90 टक्के पीक वाया गेले आहे. तर त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.