सांगली प्रति सरकारचा कणा, तुफान सेनेचे फिल्ड मार्शल आणि ब्रिटिश सरकारला ( British Govt ) नामोहरम करणारे नाव म्हणजे क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड. पलूसच्या कुंडूचे सुपुत्र असणारे क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड ( Revolution leader G. D. Bapu Lad ) यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सरकारला ( British Govt ) नासळो की पळो करून सोडले होते. जी डी बापूंनीं देश स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान हे उल्लेखनीय आहे. त्यामुळेच आजही देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास लिहिताना क्रांतीअग्रणी म्हणून जी. डी. बापू लाड यांचा उल्लेख केला जातो.
चलेजाव चळवळीसाठी सोडले शिक्षण पलूस तालुक्यातील कुंडल येथे म्हणजे तत्कालीन औंध प्रांतात असणाऱ्या कुंडलमध्ये 4 डिसेंबर 1922 रोजी गणपती दादा लाड अर्थात जी. डी. बापू यांचा जन्म झाला. त्यांचे चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण कुंडलमध्ये झाले. त्यानंतर निपाणी येथील महात्मा गांधी यांच्या सिक्का छात्रालयात ( Sikka Hostel ) त्यांना पाचवीत प्रवेश मिळाला. त्यानंतर मॅट्रिकपर्यंत शिक्षण त्यांनी औंध संस्थानच्या महाविद्यालयातून घेतले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते पुण्याच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात पोहोचले होते, मात्र गांधीजींनी 1942 मध्ये चलेजाव ही देश स्वातंत्र्यासाठीची दिलेली हाक त्यांच्या मनात बिंबली. त्यानंतर त्यांनी शिक्षण सोडून थेट स्वातंत्र्यलढ्यासाठी आपले गाव गाठले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतले शस्त्र 9 ऑगस्ट 1942 रोजी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बापू लाड यांनी प्रत्यक्ष उडी घेतली. त्यानंतर थेट इस्लामपूर आणि तासगाव या ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या विरोधात कचेरीवर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मात्र वडूज आणि इस्लामपूर इथल्या मोर्चादरम्यान ब्रिटिश पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात अनेक जण शहीद झाले. त्यानंतर अस्वस्थ झालेल्या जी. डी. बापू लाड यांनी हाती शस्त्र घेण्याचा निश्चय केला. त्यातून त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील ( Kranti Singh Nana Patil ) यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यासाठी ( freedom fight ) काम करण्याचा निर्धार केला.जुलमी ब्रिटिश सरकार आणि त्यावेळचे दरोडेखोर, जमीनदार, सावकार, गावगुंड यांच्या विरोधात लढण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटलांची तुफान सेना निर्माण झाली. तुफान सेनेचे फिल्ड मार्शल अर्थात सरसेनापती म्हणून जी. डी. बापू लाड यांची ओळख निर्माण झाली. गावागावात तुफान सेना आणि त्याच्या माध्यमातून देश स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित करण्याचे काम बापूंच्या नेतृत्वाखाली झालं.
अटकेसाठी बक्षीस ब्रिटिश सरकार विरोधात सुरू झालेल्या प्रति सरकारची चळवळ सुरू ठेवण्यासाठी पैशांची मोठी गरज होती. यातूनच मग ब्रिटिश सरकारचा खजिना लुटण्याचे काम जी. डी. बापू आणि नागनाथ नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. ज्यामध्ये धुळ्याचा खजिना असेल किंवा तत्कालीन सातारा औंध संस्थानच्या प्रांतातील शेणोली येथे ब्रिटिश सरकारची पे स्पेशल ट्रेन ही कामगारांच्या पगाराची पैसे लुटण्याची धाडसी कामगिरी असेल, त्यांनी पार पाडली. इतकेच नव्हे तर जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली कुंडलची बँक लुटण्याचे धाडसी कामही करण्यात आलं होतं. 7 जून 1943 ब्रिटिश सरकारचे पैसे लुटण्यात आले होते. मिरजहुन ब्रिटिश सरकारच्या कर्मचाऱ्यांची पगार घेऊन निघालेली पे स्पेशल ट्रेन लुटीने इंग्रज सरकारच्या पायाखालची वाळू घसरली होती. तत्कालीन औंध संस्थान प्रांतातल्या शेणोली येथील रेल्वे स्टेशन जवळ खिंडीमध्ये जी. डी. बापू लाड आणि नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसैनिकांनी पे स्पेशल ट्रेन रोखली. त्यानंतर या ट्रेनमध्ये असणारे 19 हजार रुपये लुटले होते. ज्याचा उपयोग प्रतिसरकारच्या चळवळीसाठी करण्यात आला. रोमहर्षक असणाऱ्या लुटीमुळे स्वातंत्र्य चळवळीला एक बळ मिळालं. लुटीच्या रकमेतून जी. डी. बापू लाड आणि नागनाथ अण्णा यांनी इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी गोव्याहून शस्त्र विकत आणली. पे स्पेशल ट्रेन लुटीच्या धाडसी कारवाईनंतर ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणले होते. ब्रिटिश सरकारने जी. डी. बापू लाड आणि नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या अटकेसाठी बक्षीसही जाहीर केले होते. मात्र बापू हे भूमीगत झाले. त्यामुळे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
बंदुकीची एक गोळी जी. डी. बापू लाड यांच्या पायात जी. डी. बापू लाड आणि नागनाथ नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक हादरा ब्रिटिश सरकारला देण्यात आला. तो म्हणजे धुळ्याचा खजिना लुटून. 14 एप्रिल 1944 रोजी चिमणठाणा येथे जी. डी. बापू लाड, नागनाथ नायकवडी आणि उत्तमराव पाटील यांनी योजना आखून ब्रिटिश सरकारचा खजिना घेऊन जाणारी ट्रक लुटली. यावेळी गाडी आडवण्यासाठी भर रस्त्यामध्ये नागनाथ नायकवडी आणि जी. डी. बापू लाड या दोघांनीही दारू पिऊन भांडण करत असल्याचे नाटक केलं. ते पाहून ब्रिटिशांचा ट्रक थांबला. नेमका याचा फायदा उठवत ट्रकवर हल्ला करत साडेपाच लाख रुपयांचा खजिना लुटण्यात आला. त्या घटनेनंतर खजिना घेऊन जाणाऱ्या जी. डी. बापू लाड, नागनाथ अण्णा नायकवडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मागावर ब्रिटिश सरकार एका गावात पोहोचले. नंतर जी. डी. बापू लाड व नागनाथ नायकवडी यांनी आपल्या सहकाऱ्यांना खजिना घेऊन पुढे जाण्यास सांगितलं. दोघांनीही 25 ब्रिटिश पोलिसांच्या विरोधात युद्ध सुरू केलं. गोळीबार सुरू झाला. एका बाजूला ब्रिटिश सरकारचे 25 पोलीस आणि एका बाजूला जी. डी. बापू लाड आणि नागनाथ अण्णा नायकवडी अशी धुमश्चक्री सुरू झाली होती. ज्यामध्ये ब्रिटिशांची बंदुकीची एक गोळी जी. डी. बापू लाड यांच्या पायात येऊन घुसली बापूंचा पाय रक्तबंबाळ झाला. मात्र तरीही जी. डी बापूंनी त्याठिकाणी मोर्चा सांभाळला. अंधाराचा फायदा उठवत काही वेळानंतर जी. डी. बापू लाड व नागनाथ अण्णा हे दोघे अंधारांचा फायदा उठवत तिथून सुटण्यात यशस्वी झाले.
हेही वाचा - Deepak Kesarkar उद्धव ठाकरेंची सैनिक नसलेली सेना आम्हीच खरी शिवसेना
1944 मध्ये लष्करी प्रशिक्षण केंद्र सुरू जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली कुंडल या ठिकाणी मे 1944 मध्ये लष्करी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. त्याचबरोबर जनता कोर्टाची ही स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून प्रति सरकारची चळवळ चालवली. त्यामुळेच त्यांना प्रति सरकारच्या तुफान सभेचे फिल्डमार्शल म्हणजे सरसेनापती देखील म्हणून ओळखले जाऊ लागलं.जी डी बापू लाड हे स्वतंत्र लढ्यामध्ये काम करताना इंग्रजांच्या ताब्यात कधीच सापडले नाही. मात्र स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याच्या आंदोलनादरम्यान त्यांच्या विरोधात खटला भरण्यात आला. नोव्हेंबर 1948 रोजी त्यांना अटक झाली. त्यानंतर 1950 पर्यंत दोन वर्ष नाशिक, येरवडा आणि सांगली कारागृहात 2 वर्ष राहिले. नोव्हेंबर 1950 मध्ये त्यांची सुटका झाली. त्यानंतर जी. डी. बापू लाड यांनी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. त्यानंतर राजकारणामध्ये देखील प्रवेश करत जी. डी. बापू लाड यांनी 1957 साली तासगाव विधानसभा मतदार संघातून निवडून येत आमदार झाले. पुढे 1962 मध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून विधान परिषदेवर वर्णी लागली. जी. डी. बापू लाड यांनी नेहमीच कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यास प्राधान्य दिले. क्रांतीअग्रणी म्हणून त्यांची कारकीर्द दिन दुबळ्यांसाठी लढा देण्यात गेली. 14 नोव्हेंबर 2011 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पारतंत्र्य आणि स्वातंत्र्योत्तर काळात ही जी. डी. बापू लाड यांचे कार्य अविरतपणे सुरू होते.
हेही वाचा - Sanjay Ruat यांचा असा आहे तुरुंगातील डाएट प्लॅन