सांगली - वाळवा तालुक्यातील वारणा नदी पुलाच्या सांगली व कोल्हापूर हद्दीवर चिकुर्डे हे चेकपोस्ट आहे. कोल्हापूरहून सांगली जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. येथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी व आरोग्य विभागाशी हुज्जत घालण्याचा काही नागरिक प्रयत्न करत आहेत. यामुळे या चेक पोस्टवर विनाकारण वर्दळ वाढली आहे.
या चेकपोस्टवर ई-पास व ऑनलाईन पास तपासून सोडले जाते. तर, आरोग्य विभागाकडून होम क्वारंटाईनचे शिक्के मारले जात आहेत. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी सांगली जिल्ह्यात असल्याने कृषी विभागाकडून 208 शेतकऱ्यांच्या नावाची यादी चेक पोस्टवर दिली आहे. याप्रमाणे या शेतकऱ्यांना दररोज सोडले जाते. परंतु, ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये नाहीत, असे शेतकरी सांगली पोलीस व आरोग्य विभागाशी वाद घालत आहेत. यामुळे चेक पोस्टवर वाद होण्याचे प्रकार वाढले आहेत.
वारणा नगर येथील एक माजी सैनिकाने मी शेतकरी आहे. माझे नाव यादीमध्ये का नाही, असे म्हणत वाद घातला. यावेळी पोलिसांनी व शिक्षक आरोग्य मदतनीस यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र या व्यक्तीने पोलिसांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्याने आक्षेपार्ह भाषेचा वापर करत दमदाटी केली असल्याची माहिती आहे.
कृषी विभागाने दिलेल्या 208 शेतकऱ्यांच्या यादीतील सत्तर टक्के हे शेतकरी आहेत. बाकीचे शेतीच्या नावाखाली सांगली जिल्ह्यात येऊन आपला व्यवसाय करत आहेत. तसेच, ते रोज सकाळी स्कॉर्पिओ, इनोव्हा यासारख्या महागड्या गाडीतून येतात आणि आम्हाला शेतात जायचे आहे, असे सांगून दिवसातून चार वेळेस फिरत असतात. पोलिसांनी अटकाव करावा तर, त्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट असल्याचे सांगतात.
कोल्हापूर कृषी अधिकाऱ्यांनी महत्वाच्या शेतकऱ्यांनाच जाण्याची परवानगी द्यावी. तसेच जे शेतकरी प्रामाणिकपणे शेतात जातात त्यांनी दिवसभर शेतातच थांबावे. शेतकरी लोकांना दिवसातून दोन वेळेसच सोडले जाईल. तर, काही लोक खाद्यपदार्थ, भाजीपाला व किरकोळ वस्तूंची देवाण-घेवाण करण्यासाठी चेक पोस्टवर गर्दी करत आहेत. अशा लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे, असे चेक पोस्टवरील पोलिसांचे म्हणणे आहे. तर, चेक पोस्टवर येणाऱ्या शेतकऱ्यांनी तोंडाला मास्क व हाताला सॅनिटायजर लावून ते सोबत घेऊन यावे. चेक पोस्टवर आल्यावर कोणत्याही वस्तूला हात न लावता कर्मचाऱ्यांपासून योग्य अंतर पाळत माहिती सांगावी, असे आरोग्य कर्मचारी प्रमोद पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.