सांगली - शहराच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या मिरजेतील लक्ष्मी मार्केटच्या घड्याळाची टिकटिक अखेर पुन्हा सुरू झाली आहे. 90 वर्षांपासून दिमाखात उभे असणारे हे भले मोठे घड्याळ गेल्या 15 वर्षांपासून बंद अवस्थेत होते, मात्र काही सामजिक कार्यकर्त्यांनी शहराचे वैभव असणाऱ्या या घड्याळाला दुरुस्त केल्याने या घड्याळाची टिकटिक पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
90 वर्षांपूर्वी घड्याळाची निर्मिती
मिरज शहरातील ऐतिहासिक वास्तू म्हणून लक्ष्मी मार्केटची ओळख आहे. तत्कालीन पटवर्धन सरकारांनी या इमारतीचा पाया ब्रिटिश राजवटीत रचला. 28 फेब्रुवारी 1932 मध्ये मिरज शहराच्या वैभवात भर घालणारी भव्य-दिव्य देखणी वास्तू उभारली गेली. ही इमारत उभारत असताना या इमारतीवर भल्या मोठ्या आकाराची घड्याळ देखील उभारण्यात आली.
इंडियन क्लॉककडून घड्याळाची निर्मिती
100 फूट उंचीच्या देखण्या इमारतीवर 10 बाय 10 आणि 23 फूट उंचीच्या टॉवर ही घड्याळ लावण्यात आली आहे. संपूर्ण शहराला दिसू शेकेल अशी या घड्याळाची रचना करण्यात आली आहे. रोमन आकड्यांमध्ये असलेल्या या घड्याळाची निर्मिती इंडियन क्लॉक या कंपनीकडून करण्यात आली होती.
15 वर्षांपासून बंद होते घड्याळ
मिरजकरांच्या वैभवात भर घालणाऱ्या या घड्याळाच्या काट्यांची आणि घड्याळ नियंत्रित ठेवणाऱ्या वजनाची 15 वर्षांपूर्वी चोरी झाली. तेव्हा पासून हे घड्याळ बंद होते. पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गेल्या 15 वर्षांपासून हे घड्याळ दुरुस्त झाले नाही. अखेर सामाजिक कार्यकर्ते गणेश तोडकर आणि त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेऊन या घड्याळाची दुरुस्ती केल्याने पुन्हा एकदा या घड्याळाच्या घंटा मिरजकरांच्या कानावर पडत आहेत.
अखेर घड्याळाच्या दुरुस्तीला यश
घड्याळ दुरुस्त करताना गणेश तोडकर यांना अनेक अडचणी आल्या, गेल्या अनेक वर्षांपासून ते पालिका प्रशासनाकडे घड्याळ दुरुस्त करण्याची परवानगी मागत होते, मात्र याकडे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलं होतं. काही महिन्यांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत तोडकर यांनी आपल्या मित्र परिवाराच्यावतीने पालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त स्मृती पाटील यांना लक्ष्मी मार्केट इमारत व घडयाळाच्या दुरुस्तीची परवानगी मागितली, त्यांना घड्याळ दुरुस्त करण्याची परवानगी मिळाली. मात्र परवानगी मिळाल्यानंतर, या घड्याळाच्या दुरुस्तीसाठी लागणारे सामान कोठून आणायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांनी देशभरात शोध घेऊनही अशा घड्याळाचे साहित्य त्यांना मिळाले नाही, कारण अशा घड्याळांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या बंद पडल्या होत्या. त्यामुळे तोडकर यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारचे घड्याळ कोठे आहेत. त्याची निर्मिती कशी करण्यात आलेली आहे आणि त्याचे साहित्य कुठे मिळते का ? याची चाचपणी सुरू केली, व अखेर साहित्याची जमाजमव करून त्यांनी हे घड्याळ दुरुस्त केले.
एका मशीनवर चार स्वयंचलित घड्याळ
याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे घडयाळ स्वयंचलित आणि वजनांवर नियंत्रित होतं. या घड्याळाला एक दिवसा आड चावी द्यावी लागते. या घड्याळातील पेंडुलमचे वजन तब्बल 25 किलोचे आहे. शिवाय एकाच मशीनवर चार घड्याळ चालतात. या घड्याळामध्ये असलेल्या घंट्याचा आवाज तब्बल दोन किलोमिटरच्या परिसरापर्यंत पोहोचतो.
या ऐतिहासिक घड्याळामुळे मिरजकरांच्या वैभवात भर
या ऐतिहासिक घड्याळामुळे मिरजकरांच्या वैभवात भर पडली आहे. हे घड्याळ पुन्हा एकदा सुरू झाले आहे. या घड्याळाची जपणूक करणे ही काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.