सांगली - सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या कडक निर्बंधांविरोधात भाजपाच्या खासदार-आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने तालुकानिहाय कोरोना रुग्ण संख्या आणि पॉझिटिव्हिटी रेट पाहून तेथील दुकान उघडे उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाचे खासदार संजयकाका पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. तसेच जिल्ह्यातील कडक निर्बंध उठवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा जिल्ह्यातील भाजपा खासदार-आमदारांनी प्रशासनाला दिला आहे.
'निर्बंध हटवा अन्यथा रस्त्यावर उतरू' -
लोकांची सहनशीलता संपली आहे. सर्वच ठप्प आहे. व्यापार बंद असल्याने अनेकांचे हाल होत आहे. एकीकडे कृष्णा साखर कारखानाच्या निवडणुका झाल्याने कोरोना रुग्ण वाढले आहेत. वाळवा-कडेगाव-पलूस या तालुक्याची शिक्षा इतर तालुक्यांनी का द्यावी, असा प्रश्न करत ज्या तालुक्यात रुग्ण संख्या कमी आहे. त्या तालुक्यात दुकान उघडी करा, अन्यथा भाजपाचे आमदार-खासदार बाजारात जाऊन सर्व दुकाने उघडतील, मग आमच्यावर गुन्हे दाखल झाल्यास हरकत नाही, असा इशारा भाजपच्यावतीने प्रशासनाला देण्यात आला. तसेच कोरोनाच्या काळात ज्या अधिकाऱ्यांनी काम केले नाही आणि जनतेला वेठीस धरण्याच काम केले, अश्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणीही भाजपाच्यावतीने खासदार संजयकाका पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा - शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी, होऊ शकते 7 वर्षांची शिक्षा