सांगली - ज्योतिषाला भविष्य समजत नाही मात्र, महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांना अचूक भविष्य समजते, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी टोला लगावाला आहे. चंद्रकांत पाटील यांचा निवडणूकीतील विजय आणि आकडेवारीच्या विधानाबाबत निशाणा साधत शेट्टी यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. ते सांगलीमध्ये बोलत होते.
यावेळी शेट्टी म्हणाले, अनेक भविष्यवेते, ज्योतिषांचे निवडणूक निकालाचे अंदाज आणि भाकीत चुकली. मात्र, भाजप नेत्यांचे भाकीत अचूक ठरले. त्यामुळे जोतिष्यांना भविष्य समजत नाही. परंतु भाजप नेते आणि खासकरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना अचूक भविष्य समजते, असा टोला लगावत राजू शेट्टी यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. त्याबरोबर देशातील सर्व विरोधक ईव्हीएम विरोधात आंदोलन करत आहेत. तसेच लवकरच ईव्हीएम मशीन हटावसाठी देशात जनआंदोलन उभे राहील, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साखर उद्योगाबाबत केलेल्या वक्तव्यावरून शेट्टी यांनी सरकारवर टीका केली. साखर उद्योगात आलेली मंदी आणि शेतकऱयांना न मिळणारी एफआरपी याला सर्वस्वी केंद्र सरकारचे धोरण जबाबदार, असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. 2 वर्षांपुर्वी जागतिक बाजार पेठेत साखर उद्योगात मंदी होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कच्ची साखर आयत करण्यात आली. त्यावेळी देशात साखरेला देशांतंर्गत चांगली स्थिती होती. तरीही आयात धोरणामुळे आज देशातील साखर उद्योग मंदीत आला असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.