सांगली - शरद पवार यांच्यावरील ईडीची कारवाई म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करण्याचा भाजपचा कुटील डाव असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच रविकांत तुपकर यांच्या पक्ष सोडण्याच्या भूमिकेबाबत धन्यवाद मानत, चळवळीत प्रत्येकाला स्वातंत्र्य असल्याचे मत व्यक्त करत, ईडी, सीबीआय आणि इन्कमटॅक्स या मोदी व शाहांचे कार्यकर्ते असल्याचा आरोपीही राजू शेट्टी यांनी केला आहे. ते सांगलीत ईटीव्ही भारतशी बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राजकारण राजकीय पातळी सोडून सुरू आहे. राज्य सहकारी बँक प्रकरणी शरद पवारांचा कसलाही संबंध नसताना त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई केवळ सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. राज्यातील साखर कारखान्यातील घोटाळे, मनीलॉन्ड्रिंग अशा अनेक बाबतीत 4 वर्षांपूर्वी आपण स्वतः ईडीकडे पुराव्यानिशी तक्रार दिली होती. त्याचबरोबर नुकत्याच कडकनाथ कोंबडी घोटाळ्या प्रकरणीही पुराव्यानिशी आपण तक्रारी दाखल केली आहे. मात्र, या तक्रारीची दखल घेण्यात येत नाही.
हेही वाचा - कमी जागा मिळाल्या तरी राष्ट्रीय समाज पक्ष युती सोबतच राहणार - मंत्री महादेव जानकर
तसेच राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याचा आकडा 200 ते 250 कोटींपर्यंत निश्चित झाला असताना तसेच बँकेच्या ठेवी 11 हजार कोटींच्या आसपास असताना, 25 हजार कोटींचा घोटाळा कसा झाला, असा प्रश्न उपस्थित शेट्टी यांनी केला. ज्यांचा कसलाही संबंध नाही, त्या शरद पवारांवर मात्र कारवाई करण्यात येते. यामागे भाजपचे राजकारण आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांना बदनाम करण्याचा भाजपचा हा कुटील डाव असल्याचा आरोप करत राजू शेट्टींनी शरद पवारांना समर्थन दिले आहे.
त्याचबरोबर अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत फारसे बोलणे टाळत, शरद पवारांच्या बाबतीत जे घडलय त्याबाबत दुःखी होऊन त्यांनी राजीनामा दिला असेल आणि त्यांच्या भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्यावर बोलता येईल, असे सांगितले. रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीमध्ये केलेल्या प्रवेशाबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, खरेतर चळवळीत प्रत्येकजण आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम करत असतो. त्यामुळे चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला विचार स्वातंत्र्य असते. चळवळीतील कार्यकर्ता हा घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजत असतो. त्यामुळे चळवळीत काम करणे, थांबवणे हा त्यांचा प्रश्न असतो. यामुळे रविकांत तुपकर यांच्यावर आक्षेप घेणे योग्य होणार नाही. तुपकारांनी अनेक वर्षे शेतकरी चळवळीत योगदान दिले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानणे यातच शहाणपण आहे, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.
हेही वाचा - 'ईडीच्या कारवाईचे स्वागतच पण, मुख्यमंत्र्यांवरसुद्धा गुन्हा दाखल करा'
तसेच आगामी विधानसभा निवडणुका या भाजप सेने विरोधात ताकदीने स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवणार आहे. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याबाबत सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन पन्नास जागांची मागणी आघाडी केली आहे. काँग्रेस आघाडीने 38 जागा सध्या देऊ केल्या आहेत. मात्र, आणखी 12 जागांसाठी आपण आग्रही आहोत आणि निश्चितच जागावाटप यशस्वीरित्या सुटेल, असा विश्वास व्यक्त करत, स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली, कोल्हापूर यासह नगर, वर्धा अशा एकूण बारा ठिकाणी निवडणूक लढण्याबाबतीत प्रयत्नशील असल्याचा शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.