सांगली- दुष्काळग्रस्तांना दुष्काळी सवलतींचा लाभ मिळावा यासाठी जत तालुक्याच्या ग्रामस्थांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱयांची भेट घेतली. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे दुष्काळ योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला.
जिल्ह्यातील जत तालुक्यात दुष्काळाची दाहकता जास्त आहे. यातली पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी सवलतीचा लाभ अद्याप मिळत नसल्याने संतप्त दुष्काळग्रस्तांनी आज शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, जिल्हाध्यक्ष अशोकराव माने यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे तालुक्यात पाणी, जनावरांचा चारा उपलब्ध करून द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. शासनाकडून जाहीर झालेल्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा शेतकरी संघटना दुष्काळग्रस्तांना घेऊन तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी रघुनाथदादा पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.