इस्लामपूर - नागरिकांना पुरेशी व्यवस्था करण्यासाठी, एक दिवसाचा वेळ देत शहरात बुधवार, ४ मेपासून कडक जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शहरातील रुग्णसंख्या 300 वर गेल्याने पदाधिकारी आणि प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ५ ते ९ मे अखेर हा जनता कर्फ्यु असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पक्षप्रतोद विक्रम पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
शहराच्या सर्व सीमा बंद
शहरातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन रविवारी झालेल्या नगरपालिकेच्या सभेत मंगळवारपासून जनता कर्फ्यु लागू करण्याचे ठरले होते; परंतु आज झालेल्या बैठकीत अचानक संचारबंदी लागू न करता नागरिकांना एक दिवसाचा वेळ देऊन, बुधवारपासून कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय झाला. ५ ते ९ मे या कालावधीत फक्त मेडिकल व आरोग्य सेवा या नियमावलीचे पालन करून सुरू राहतील. दूध डेअरी व दुध विक्रेते यांना सकाळी १० पर्यंत संकलन व घरपोच वितरणाकरिता मुभा देण्यात आली आहे. शहराच्या सर्व सीमा बंद केल्या जाणार आहेत. अत्यावश्यक कारण व काम असल्याशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी गोंधळून न जाता शिस्तीचे पालन करावे
रविवारी पालिकेच्या सभेत मंगळवारपासून जनता कर्फ्यु लागू करण्याबाबत चर्चा झाली होती. कर्फ्युचे स्वरूप काय आणि कसे असेल याबाबत तहसीलदार यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय जाहीर करण्याचे ठरले होते, त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी आज बाजारपेठेत सकाळी 7 ते 11 या वेळेत प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. प्रशासनाने उद्याचा (४) एक दिवस दिला आहे. दरम्यान नागरिकांनी गोंधळून न जाता शिस्तीचे पालन करून नियोजन करावे, असे आवाहन आजच्या बैठकीत पालिका प्रशासनाने केले आहे.
'कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका'
शहरातील विविध संघटना, विक्रेते, व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या जनता कर्फ्युचे पालन करावे. रुग्णसंख्या वाढत आहे. आपण काळजी घेतली नाही तर आपल्यावरदेखील वाईट वेळ येऊ शकते. कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, प्रशासनाला सहकार्य करावे." असे इस्लामपूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी अरविंद माळी हे म्हणाले आहेत.
हेही वाचा - 'कोरोना संकटात सगळंच रामभरोसे आहे'