सांगली - येथील वाळवा तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी महामार्गावरील काही झाडे उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर, कणेगाव चेक पोस्टवरील छत उडून गेल्याने साहित्याची मोडतोडही झाली.
जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे मुळापासून उन्मळून पडली. तर, काही ठिकाणी घरावरील पत्रेही उडून गेल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कणेगाव चेक पोस्टच्या मंडपावरील छत उडून गेल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. तर, महामार्गावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दोन ते तीन तास पडणाऱ्या पाऊसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. यामुळे दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. तर हा पाऊस शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या मशागतीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे.