सांगली - मोबाईल चोरी करणाऱ्या एका टोळीला सांगली पोलिसांनी जेरबंद केले आहे. दोघा जणांना अटक करत त्यांच्याकडून 77 जुने व नवीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
हेही वाचा - ..तर गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा; रघुनाथ पाटलांची मागणी
सांगली आणि परिसरात मोबाईल चोरून विक्री करणाऱ्या एका टोळीचा सांगली शहर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयिताकडून चोरीचे 77 मोबाईल हस्तगत केले. सांगली शहर आणि परिसरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली होती. त्याचबरोबर चेंनस्नेचिंग आणि धूम स्टाईल मोबाईल लांबवण्याच्या घटना वाढल्या होत्या. याचा तपास करत असताना, सांगली शहर पोलिसांनी ए टू झेड मोबाईल दुकानाचा चालक रजाआली राजनी याला ताब्यात घेतले असता, त्याने चोरीच्या मोबाईलचे लॉक तोडून ते विक्री करत असल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी त्याच्या दुकानाची झाडाझडती घेतली, असता बिले नसणारे 77 जुने मोबाईल हँडसेट आढळून आले. याबाबत अधिक चौकशी केली असता जॉर्डन इराणी, महंमद इराणी आणि यासीन इराणी यांनी हे मोबाईल विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून 1 लाख 15 हजार किमतीचे 77 मोबाईल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपधीक्षक अशोक वीरकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - एनआरसीसह 'कॅब' कायदा रद्द करा; एमआयएमची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने