सांगली - कुरळप व ऐतवडे खुर्द गावातील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना रॅपिड अँटिजेन तपासणीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. गुरुवारी सकाळी 11वाजताच्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कुरळप गावातील कोरोना समिती व ग्रामपंचायतप्रशासन यांची मिटिंग घेण्यात आली. यामध्ये रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्या लोकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे ठरले.
त्यानंतर दुपारी 4च्या दरम्यान ऐतवडे खुर्द व कुरळप गावातील चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकातच टेस्ट करण्यात आली. यामध्ये महिला, मुली, युवक व वयस्कर यांचा समावेश होता. याप्रमाणे दररोज कोणत्याही वेळेस चौका चौकात थांबून टेस्ट करणार असल्याचे आरोग्य सेवक नानासो भोसले व सुनील पवार यांनी सांगितले. यावेळी चौकात टेस्ट करताना पाहून लोकांची एकच तारांबळ उडाली. तर या रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह सापडणाऱ्याला पंधरा दिवस विलगीकरण कक्षात ठेवणार असल्याचे सांगताच काही नागरिकांनी धूम ठोकली.
कारवाईमध्ये कुरळप पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अनिता मेनकर, पोलीस हवालदार बाजीराव भोसले, सचिन मोरे, दादासो ढोले व स्वतः सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी सहभाग घेतला. तर आरोग्य सेवक सुनील पवार नानासो भोसले व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.