सांगली - कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असताना ग्रामीण भागातील नागरिक मात्र बेफिकीरपणे वावरत आहेत. पोलीस व प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही नागरिक घोळक्याने रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत कामाशिवाय फिरणाऱ्यांना चांगलेच चोपले. त्यासह उठाबशा काढण्यासही लावल्याने अखेर रस्त्यावरची गर्दी कमी झाली. ही कारवाई कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अरविंद काटे व शिराळा पोलीस ठाण्याचे विशाल पाटील यांनी केली.
इस्लामपूरमध्ये 4 रुग्ण आढळल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. कुरळप पोलीस ठाणे आणि शिराळा पोलीस ठाणे परिसरात विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना चोपले. मुंबईवरुन सांगली जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाश्यांना शिराळा पोलिसांनी चोप देत "मै देशद्रोही हू, घर नही जाऊंगा" असे फलक लावून उठाबशा काढायला लावल्या. त्यानंतर त्यांना समज देत परत मुंबईकडे रवाना केले. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणात चांगलीच दहशत पसरली.