सांगली - फोन टॅपिंगचा प्रकार हा अत्यंत गंभीर असून, रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचा अधिकार कोणी दिला ? असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी किती बदल्या केल्या ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. विरोधक सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
'फोन टॅपिंगची चौकशी करा'
पोलीस दलातील बदल्यावरून माजी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला यांच्या आरोपानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावरून जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या फोन टॅपिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, त्यांना फोन टॅपिंगचे अधिकार कोणी दिले होते? त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान बदल्यांवरून होत असलेले आरोप तथ्यहीन असून, सर्व बदल्या नियमानुसारच झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात पोलीस दलाच्या आस्थापना मंडळाला डावलून किती बदल्या केल्या? याचा आकडा समोर आला पाहिजे. त्यांनी तर थेट ऑर्डर काढून काही बदल्या केल्या आहेत. त्या बदल्यांमध्ये किती पारदर्शकता होती? याचा अभ्यास त्यांनी करावा असा टोलालाही यावेळी पाटलांनी फडणवीसांना लगावला आहे.
'गृहमंत्र्यांवर आरोप नाहीत'
रश्मी शुक्ला यांनी जो अहवाल सादर केला आहे, त्यामध्ये गृहमंत्र्यांवर आरोप नाहीत. त्यामध्ये खासगी व्यक्तीवर आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांचा अहवाल आणि त्यांनी दिलेली उदाहरण चुकीची आहेत. असे म्हणत त्यांनी यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखन केली आहे.
'एनआयएने सत्य समोर आणावे'
अंबानींच्या घरासमोर सापडलेले स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणावर बोलताना जयंत पाटलांनी म्हटले आहे की, ही स्फोटके नेमकी तिथे आली कशी, कोणी ठेवली? हिरेन यांचा मृत्यू कसा झाला? या सर्व प्रकरणातील सत्य आता 'एनआयए'कडून समोर आले पाहिजे.
हेही वाचा - केंद्र सरकारकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य; ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मिळणार लस