सांगली - करजगी येथे पुलावरून वाहणाऱ्या प्रवाहात ट्रॅक्टर उलटा झाल्याची घटना गुरुवारी (15 ऑक्टोबर) घडली. या दुर्घटनेत पिंटू ऊर्फ परमेश्वर भीमराव धायगुडे (वय -32) हा तरुण वाहून गेला होता. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर शनिवारी (17ऑक्टोबर) त्याचा मृतदेह बोर नदीत सापडला.
जत तालुक्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असताना नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.
चेन्नई दूध डेअरीच्या दुधाची करजगी भिवर्गी पुलावरून ट्रॅक्टरमार्फत वाहतूक सुरू होती. यावेळी पिंटू धायगुडे ट्रॉलीमध्ये बसला होता. त्याने दोन वेळा दुधाची वाहतूक केली. मात्र शेवटच्या फेरीला पाण्याचा प्रवाह वाढल्याने ट्रॅक्टर पुलावरच अडकला; आणि प्रवाहामुळे उलटला. यावेळी चालक सोमलिंग लायप्पा पुजारी याने उडी मारल्याने तो बचावला.