सांगली - बँकेत पैसे काढायला गेलेल्या एका महिलेला ताप असल्याच्या कारणाने प्रवेश नाकारल्याची घटना घडली. यामुळे महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी बँकेच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी चौघांना मिरज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिरजेतील बँक ऑफ बडोदाच्या एका सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी बँकेत पैसे काढण्यासाठी एक महिला पोहोचली होती. यावेळी बॅंकेकडून करण्यात येणाऱ्या तपासणीमध्ये सदर महिलेस ताप असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तिथे असणाऱ्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याने त्या महिलेला प्रवेश नाकारत, दवाखान्यात जाऊन उपचार घेऊन परत येण्याचा सल्ला दिला. यानंतर त्या महिलेने आपल्या पतीला याची मोबाईलवर कल्पना देऊन बोलवून घेतले. तत्काळ बँकेच्या ठिकाणी सदर महिलेच्या पतीसह चौघेजण पोहोचले व त्यांनी सुरक्षा रक्षकासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. यातून चौघांनी बँकेच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली.
या सर्व घटनेची माहिती मिरज शहर उपविभागीय अधीक्षक संदीपसिंग गिल यांना कळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. मारहाण करणाऱ्या चारही तरुणांना ताब्यात घेतले आहे. तर ताप असल्याच्या कारणाने प्रवेश नाकारलेल्या महिलेला दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले.