सांगली - जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका प्रशासनाने आता सजक पाऊल उचलले आहे. महापालिका क्षेत्रात इतर शहरातून विशेषतः मुंबई,पुणे येथून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना चाचणीनंतरच आता शहरात प्रवेश मिळणार आहे. अशा सुचना महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहे.
दुसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज
सांगली महापालिकेसह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एका दिवसात 360 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आता पर्यंत जिल्ह्यात 53 हजार 140 जण बाधित झाले आहेत. तर 1 हजार 870 जानांचा मृत्यू झाला आहे. आता पुन्हा जिल्ह्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून राज्यात कोरोना नियमांचे कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून कोरोनाच्या बाबतीत सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.
तपासणी करूनच शहरात प्रवेश
सांगली महापालिका क्षेत्रामध्ये बाहेरील जिल्ह्यातून विशेषतः मुंबई आणि पुणे या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करणे अनिवार्य आहे. मुंबई-पुणे या ठिकाणाहून मोठ्या संख्येने प्रवासी दाखल होतात. अशा बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन किंवा इतर सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहतुकीची ठिकाणे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे तपासणी करण्यात येणार आहे. एखाद्या प्रवाशाला कोरोना लक्षणे आढळल्यास तत्काळ महापालिकेच्या कोरोना सेंटर मध्ये दाखल करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई सह इतर जिल्हे व परराज्यातुन येणाऱ्या प्रवाशाची तपासणी झाल्यानंतरच शहरात प्रवेश मिळणार आहे.
हेही वाचा-आरोग्यमंत्र्यांची अचानक मालेगावला भेट; सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयांची केली पाहणी