सांगली - 15 ऑगस्टपर्यंत MPSC च्या परीक्षा जाहीर करा, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत, अशांना नियुक्ती पत्र द्या आणि आयोगावरील सदस्य नेमा, अन्यथा महाविकास आघाडी सरकारविरोधात राज्यातील MPSC विद्यार्थ्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. ते इस्लामपूरमध्ये बोलत होते.
- तारीख उलटली पण कार्यवाही नाही -
सदाभाऊ खोत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिलेला होता की, 31 जुलैच्या अगोदर आम्ही राज्यातील MPSC च्या सर्व जागा भरू आणि रखडलेल्या नियुक्त्यासुद्धा देऊ, तसेच MPSC साठी जो आयोग आहे, त्यावरील सदस्यसुद्धा तातडीने नियुक्ती करू, असा शब्द सभागृहाला दिला होता. मात्र, 31 जुलै संपला पण एकही शब्द महाविकास आघाडी सरकारच्यावतीने पाळला गेला नाही. खोटं बोल पण रेटून बोल, अशा पद्धतीचा कारभार या राज्यातल्या सरकारचा चालला आहे. अजून किती स्वप्नील लोणकर सारख्या आत्महत्या या सरकारला पाहिजे आहेत, हे सरकार खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वासघात करणारे सरकार आहे. मात्र, आम्ही या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा खोत यांनी सरकारला दिला आहे.
- 15 ऑगस्टनंतर सरकारविरोधात आंदोलन -
दरम्यान, MPSC बाबत दिलेला शब्द पाळला नाही, तर 15 ऑगस्टनंतर महाविकास आघाडी सरकारविरोधात राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
एमपीएससीचा परीक्षार्थी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. यावरील चर्चेला उत्तर देताना एमपीएससीची सर्व पदे 31 जुलै 2021 पर्यंत भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदनात केली होती.
तेव्हा काय म्हणाले होते अजित पवार, पाहा -
31 जुलैपर्यंत एमपीएससीची सर्व पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा