सांगली - जिल्ह्यातील कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. शिराळा तालुक्यातील निगडीमधील एक महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या महिलेच्या कुटुंबातील ११ जणांना प्रशासनाने तात्काळ क्वारंटाईन केल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.
कोरोनाबाधित महिला व तिचा भाऊ हे १६ एप्रिल रोजी मुंबईहून शिराळा तालुक्यातील निगडी या गावी आले होते. दोन दिवसांपूर्वी शिराळा तालुक्यात फिव्हर क्लिनिकमध्ये महिलेची तपासणी करण्यात आली होती. यावेळी तपासणीमध्ये महिलच्या तब्येतीविषयी आरोग्य पथकाला शंका आल्याने इस्लामपूरमध्ये तिला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. तिला ताप आल्याने मिरजेच्या कोरोना रुग्णालयात भावासह दाखल करण्यात आले. स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. या महिलेचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.
टाळेबंदीत असतानाही महिला व तिचा भाऊ १६ एप्रिल रोजी शिराळ्यात कसे पोहोचले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या सांगलीतील रुग्णांची संख्या पुन्हा एक झाली आहे. जिल्ह्यात एकूण २६ जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील खेराडे वांगी या गावात कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या ३० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मुंबईमध्ये राहणाऱ्या एका रिक्षाचालकावर त्याच्या मूळगावी अंत्यसंस्कार पार पडले. मात्र, त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे मृत्यूनंतर समोर आले होते.
हेही वाचा-लॉकडाऊनमध्ये पक्षांना मिळालं हक्काचं घर; इस्लामपुरातील शिक्षक दाम्पत्याचा उपक्रम