सांगली - जिल्ह्यात आज कोरोनाचा आठवा बळी गेला तर दिवसभारत १६ नव्या रुग्णांची नोंद झाली. सहा रूग्ण कोरोनामुक्त झाल्यांने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज सापडलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ९७ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण २२२ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ११७ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत, तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत आणखी १६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला रूग्ण हा वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी येथील ५० वर्षीय व्यक्ती आहे. १२ जून रोजी या व्यक्तीला अत्यावस्थ स्थितीमध्ये मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती आणखी बिघडल्याने त्याचा आज मृत्यू झाला. मृत व्यक्ती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता.
आज सायंकाळपर्यंत कोरोनाचे १६ नवे रूग्ण आढळून आले. हे सर्व रूग्ण मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले आहेत. आज पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये शिराळा तालुक्यातील ५, पानूंब्रे १, खेड १, माळेवाडी १, पलूस १, भाळवणी १, भिकवडी बुद्रुक १, बुधगाव २, कडेगाव वांगी १, पुनवत १, फाळकेवाडी १ येथील रुग्णांचा समावेश आहे.
आज सहाजण कोरोनामुक्त झाले. यामध्ये सोनारसिद्ध नगर येथील ५२ वर्षीय पुरुष, झरे येथील ५ वर्षीय मुलगा, कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील २६ वर्षीय महिला, खरशिंग येथील २१ वर्षीय मुलगा, वायफळे येथील १९ वर्षीय मुलगा आणि खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील ३५ वर्षे पुरुषाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.