सांगली - भावाच्या मृत्यूचा धक्का असह्य झाल्याने मोठ्या बहिणीने आक्रोश करत जीव सोडल्याची हृदयद्रावक घटना येळवी (ता. जत ) येथे घडली आहे. भाऊ केशव बाबू माने (वय ६५) आणि बहिण हौसाबाई ज्ञानू जानकर (वय ७०) असे भाऊ व बहिणींची नावे आहेत. या घटनेने येळवी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जत तालुक्यातील येळवी येथील केशव बाबू माने यांना पोटाच्या विकराचा त्रास होत होता. अशातच ऑक्सिजन कमी झाल्याने सांगोला येथील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू होता. दरम्यान बुधवारी नातेवाइकांनी केशव माने यांना घरी आणले होते. त्यांनी रात्री कुटुंबासोबत जेवणही केले. त्यानंतर त्यांना गुरुवारी पहाटे अस्वस्थ वाटू लागले, यातच केशव यांचा मृत्यू झाला.
गेली अनेक वर्षे भावासोबतच आपल्या कुटुंबासमवेत राहिलेली बहीण हौसाबाई जानकर यांना हा धक्का सहन झाला नाही. भाऊ बहिणीचे नाते अतूट होते. बहिणीला भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच ती दिवसभर आक्रोश करत होती. दुर्दैवाने भाऊ गेल्याच्या बारा तासाच्या आतच बहिणीचा गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता माणूस गेल्याने माने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. केशव माने यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व जावई असा परिवार आहे. एकाच दिवसात कुटुंबातील दोघां भाऊ व बहिणीच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.