सांगली - प्रेम प्रकरणातून नर्सने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही घटना मिरज शहरात घडली असून आम्रपाली कांबळे असे या नर्सचे नाव आहे. ती एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. आम्रपालीने आत्महत्येपूर्वी लिहलेली सुसाईड नोट पोलिसांना घटनास्थळी सापडली आहे.
प्रेमविवाहाला मान्यता तरी नर्सची आत्महत्या...
मिरजेतील मराठे मिल चाळ, येथील रमामाता आंबेडकर कॉलनीत आम्रपाली सतीश कांबळे, ( वय 20 ) ही आपल्या कुटुंबीयांसह राहते. आम्रपाली खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. एका मुलासोबत तिचे प्रेम संबंध होते. तिच्या या प्रेमाची माहिती कुटूंबाला मिळाल्यानंतर त्यांनी दोघांच्या लग्नाला होकारही दिला होता. पण मंगळवारी तिने राहत्या घरी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतले. याबाबतची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर नातेवाईकांनी तिला उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे.
आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. पोलिसांनी मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. या आत्महत्येप्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.