सांगली - कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी (in case of krishna river pollution) कोल्हापूर विभागीय प्रदूषण महामंडळानी, सांगली महानगरपालिकेला नोटीस बजावली (notice to sangli muncipal corporation) आहे. शेरीनाला आणि हरिपूर नाल्यातून कृष्णा नदीत मिसळणाऱ्या सांडपाणी प्रकरणी सात दिवसात खुलासा देण्याचे आदेश देत, कारवाईचा इशारा या नोटीसद्वारे महापालिकेला देण्यात आला आहे. त्यामुळे सांगली महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीत प्रदूषण : प्रकरणी अखेर कोल्हापूर विभागीय प्रदूषण महामंडळाकडून दखल घेण्यात आली. सांगली शहरातलं सांडपाणी शेरीनाला आणि हरिपूर नाल्याच्या माध्यमातून कृष्णा नदीत मध्ये थेट मिसळते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित होते. या बाबतीत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे व मुंबई उच्च न्यायालयातील वकील ओंकार वांगीकर यांच्या माध्यमातून प्रदूषण महामंडळाकडे सांगली कृष्णा नदीच्या प्रदूषण रोखण्या बरोबरच, पालिकेवर कारवाईसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. तर हरित लवाद न्यायालयाकडून महापालिकेला कृष्णानदी प्रदूषण प्रकरणी दंडही करण्यात आला होता.
कायदेशीर कारवाईचा इशारा : आता सांगली कृष्णा नदीच्या प्रदूषण प्रकरणी कोल्हापूर विभागीय प्रदूषण महामंडळाकडून सांगली महापालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. आतापर्यंत अशा प्रकारची कोणतीही नोटीस महापालिकेला बजावण्यात आली नव्हती, केवळ स्थानिक प्रदूषण महामंडळाकडून समज नोटीस बजावण्यात येत होती. मात्र आता कोल्हापूर प्रदूषण महामंडळाने थेट महानगरपालिकेला येत्या सात दिवसांमध्ये शेरीनाला, हरिपूर रोड व इतर नाल्यांच्या माध्यमातून कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबतीत खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दिलेला खुलासा, योग्य न वाटल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आल्याची माहिती, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे व मुंबई उच्च न्यायालयातील वकील ओंकार वांगीकर यांनी दिली आहे.