सांगली - इस्लामपूर येथील १०८ वर्षीय वृद्ध महिलेने कोरोना लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत. जरीना अब्दुल शेख असे या आजीबाईंचे नाव आहे. यानिमित्ताने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आजीबाईंचा साडी-चोळी देऊन सत्कार केला आहे.
कोरोनामुळे भल्याभल्यांना घाम फुटला आहे. मात्र, इस्लामपूर शहरातील टकलाईनगर येथील १०८ वर्षीय जरीना अब्दुल शेख यांनी कोरोनाला आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. याशिवाय कोरोना विरोधातील लढ्यात त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. जरीना यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. यातून जिद्दीने लढण्याचा एक संदेशही त्यांनी दिला आहे.
आजीबाईंचा साडी-चाळी देऊन सत्कार
जरीना यांनी लसीचे दोन्हीही डोस पूर्ण केल्याची माहिती जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना मिळाली. त्यामुळे जयंत पाटलांनी थेट आजीबाईंचा सत्कार केला. जयंत पाटलांनी आजीबाईंचे कौतुक केले. त्यांना साडी-चोळीही भेट देण्यात आली.
दरम्यान, 'लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते, हे आज जरीना यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाला पराभूत करावे', असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
हेही वाचा - ईटीव्ही विशेष : बेवारसांचा आधारस्तंभ असलेले समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्याशी खास संवाद...