सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. गुरुवारी कोरोनामुळे आणखी दोन जणांचा बळी गेला आहे. तर, दिवसभरात ६२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यात सांगली महापालिका क्षेत्रातील २९ जणांचा समावेश आहे. तर, उपचार घेणारे १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ३९६ तर एकूण रुग्णांची नोंद ८४१ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरुवारी यामध्ये आणखी भर पडली असून उपचार घेणाऱ्या दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये मिरज शहरातील पंढरपूर रोड वरील ७३ वर्षीय व्यक्ती व वाळवा तालुक्यातील शिगाव येथील ५२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा २५ झाला आहे. तर, गुरुवारी दिवसभरात आणखी ६२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल २९ जणांचा समावेश आहे. ज्यामध्ये सांगली शहरातील ५ आणि मिरज शहरातील २४ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये आटपाडी तालुका - तडेवाडी ३, हिवतड १, नेलकरंजी ७, अर्जुनवाडी २, शेटफळे २, तडवळे १, शिराळा तालुका - रेड ५, बांबरवाडी २, कडेगाव तालुका भिकवडी खुर्द - १, तोंडोली १, मिरज तालुका - बुधगाव ३, नांद्रे १, कवलापूर १, दुधगाव १, कवठेमहाकाळ तालुका - घोरपडी १, वाळवा तालुका - शिगाव १ जण आणि महापालिका क्षेत्रातील २९ असे एकूण ६२ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर, गुरुवारी दिवसभरात उपचाराअंती १५ जण हे कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच कोरोना उपचार घेणारे २१ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यांची प्रकृति चिंताजनक आहे. यापैकी १३ जण हे ऑक्सिजनवर असून ८ जण हे इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत.
गुरुवारी दिवसभरात वाढलेले रुग्ण व कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ३९६ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली, असून यापैकी आज पर्यंत ४२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.