सांगली - जिल्ह्यात गुरुवारी नवीन तीन रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. मुंबईहून येणाऱ्या व्यक्तींमुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी मुंबईहून आलेल्या आणखी तीन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
गुरुवारी पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णांमध्ये खानापूर तालुक्यातील गोरेवाडी येथे मुंबईहून आलेला ४५ वर्षे पुरुष, कडेगाव तालुक्यातील नेरली येथे नवी मुंबईहून आलेला ५७ वर्षीय पुरुष आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंह गाव येथील एका कोरोणाबाधित रुग्णाची आई कोरोनाबाधित झाली आहे.
तर कोरोना उपचार घेणारे ६ कोरोनाबाधित रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये मिरज तालुक्यातील कर्नाळ मधील १, जत तालुक्यातील अंकले येथील १, शिराळा तालुक्यातील रेड येथील २, वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी मधील १ आणि आटपाडीच्या मरगळे वस्ती येथील १ असे ६ जण कोरोना मुक्त झाले आहेत.
सांगली जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ही ४४ झाली आहे. यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये कडेगावच्या नेरली येथील ५७ वर्षीय पुरुष असून ही व्यक्ती मुंबईवरून आलेला प्रवासी आहे. सोलापूरच्या कडेबिसरी तालुका सांगोला येथील ४८ वर्षीय पुरुष ऑक्सिजनवर आहे. तर शिराळा तालुक्यातील खिरवडे येथील ५६ वर्षीय पुरुष ही नॉन इनव्हेजिव व्हेंटिलेटरवर तर खानापूर सुलतानगादे येथील ५७ वर्षीय महिलेला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत .
जिल्ह्यात आज अखेर कोरोनाबाधित ठरलेले रुग्ण संख्या १०१ झाली आहे तर ५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या ही ४४ असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.