सांगली - गेल्या 6 वर्षात पुणे पदवीधर मतदारसंघातील प्रश्न सुटण्याऐवजी वाढवण्याचे काम झाल्याची पदवीधरांची धारणा झाली. त्यामुळेच अरुण लाड यांचा विजय झाला आहे, असे मत व्यक्त करत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. तसेच पदवीधरांच्या प्रश्नांसाठी नुतून आमदार अरुण लाड यांनी प्रसंगी सरकारशी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, असा सल्लाही पाटील यांनी दिला आहे. सांगलीमध्ये आयोजित सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते.
जयंत पाटील आणि अरुण लाड यांचा सत्कार-
पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड आणि विजयासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांचा गुरुवारी सांगली मध्ये सत्कार करण्यात आला. समस्त जैन समाज सांगली यांच्या वतीने माजी महापौर सुरेश पाटील यांनी या सत्कार सोहळाचे आयोजन केले होते. यावेळी सन्मान पत्र देऊन उद्योजक सुभाष बेदमूथ यांच्याहस्ते पाटील यांचा हा सत्कार समारंभ पार पडला.
भाजपाकडून मतदान नोंदणी पासून भानगडी-
यावेळी बोलताना पुणे पदवीधर मतदारसंघाचे नूतन आमदार अरुण लाड म्हणाले, पदवीधर निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीमध्ये भाजपाकडून मोठ्या प्रमाणात भानगडी करण्यात आल्या, मतदार नोंदणी पासून ते निवडणुकीच्या मतदानापर्यंत भाजपाकडून सर्वप्रकारचे उद्योग करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून पदवीधरांचे प्रश्न हे सुटलेले नाहीत, राज्यात आणि केंद्रात त्यांचे सरकार होते. मात्र पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत, त्यामुळे भाजपाला कंटाळलेल्या मतदारसंघातल्या जनतेने महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून मला विजयी केले, असे मत लाड यांनी व्यक्त केले आहे.
प्रसंगी सरकारशी संघर्ष करावा..
या समारंभात जलसंपदा व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना म्हणाले, मागच्या सहा वर्षांमध्ये पुढे पदवीधर मतदारसंघातील पदवीधरांचे प्रश्न हे सुटले नाहीत. उलट वाढवण्याचे काम आजपर्यंत झाले, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. मात्र आता महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे नुतून आमदार अरुण लाड हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करतील, आणि पाठपुरावा करण्यात ते आघाडीवर देखील असतात, असेही मत व्यक्त केले. तसेच पदवीधरांचे आज 100 प्रश्न आहेत, आणि अरुण लाड यांनी या पुढील काळात पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करावे लागणार आहे. तसेच पदवीधरांच्या प्रश्नासाठी प्रसंगी त्यांनी सरकारशी संघर्षही करावा, असा सल्लाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अरुण लाड यांना यावेळी दिला .