सांगली - खटाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा खून झाल्याची घटना घडली. अज्ञातांनी धारधार शस्त्रांनी हल्ला करत हा खून केला आहे. आनंद पाटील असे खून झालेल्या नेत्याचे नाव असून, ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव गजानन पाटील यांचे बंधू आहेत.
सांगलीच्या पलूस तालुक्यातील खटाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आंनदराव पाटील यांची काही अज्ञातांनी हत्या केल्याची घटना घडली. रविवारी दुपारच्या सुमारास पाटील हे घरी निघाले असता, दोघा अज्ञातांनी दुचाकीवरून येत पाटील यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये पाटील गंभीर जखमी झाले. यानंतर पाटील यांना जखमी अवस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना पाटील यांचा मृत्यू झाला.
आनंदराव पाटील हे खटाव गावचे माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव असणारे गजानन पाटील यांचे ते मोठे बंधू आहेत. आनंद पाटील यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी कळताच सांगलीच्या शासकीय रुग्णालयात राजकीय नेत्यांनी भेट दिली. तर हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास सांगली पोलीस करत आहेत.