सांगली - शरद पवारांवर टीका केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध होत आहे. मात्र, सांगलीत एका राष्ट्रवादी नगरसेवकाने आमदार पडळकर यांचे स्वागत करत चक्क दुचाकीवर शहरभर घेऊन फिरल्याचा प्रकार घडला आहे. जत नगरपालिकेचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने हे धाडस केले आहे. त्यामुळे सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस याची दखल घेणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात आमदार पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले चित्र दिसत असताना, दुसरीकडे सांगली जिल्ह्यातल्या एका राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाने मात्र, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत करत त्यांना आपल्या दुचाकीवरून शहरभर फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे. जत मधल्या जत नगरपालिकेचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीम एडके यांच्याकडून हा प्रकार घडला आहे. आमदार पडळकर हे आज जत तालुका दौऱ्यासाठी जत शहरात पोहचले होते. यानंतर जत नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके हे पडळकर यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यानंतर नगरसेवक एडके यांनी आपल्या दुचाकीवरून आमदार पडळकर यांना शहरभर फिरवले.
राज्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ही पडळकर यांच्या विरोधात असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक असणारे टीमु एडकेच पडळकर यांना घेऊन फिरत असल्याने जत शहरांमध्ये सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता या प्रकारानंतर सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आता राष्ट्रवादीचे नगरसेवक असणाऱ्या टीमु एडके यांच्याबाबतीत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.