सांगली - केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या विरोधात सांगलीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. यात रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला.
हेही वाचा - '११४ कोटींच्या निधीमधून काय विकासकामे झाली ते दाखवा'; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे नगराध्यक्षांना आव्हान
गॅस दरवाढीचे संतप्त पडसाद देशभर उमटत आहेत. सांगलीतही गॅस दरवाढीचे पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून केंद्राच्या या दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापत केंद्राच्या गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला. महिला आघाडीच्या अध्यक्ष विनया पाठक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी केंद्र सरकारने केलेली दरवाढ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.
मोदी सरकारने सर्वसामान्यांना आर्थिक संकटात टाकले
आधीच कोरोनाच्या संकटाने सर्वसामान्य भरडला गेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारने गॅस दरवाढ करून सर्वसामान्यांना आर्थिक संकटात टाकण्याचे काम केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने केला. तसेच, या पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
हेही वाचा - ताडी-माडी दारुमध्ये भेसळ करणाऱ्या दुकानांवर कारवाई करा - जयश्री पाटील