सांगली - बंदोबस्तासाठी पोलिसांना उभे करणाऱ्या आयोजकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारले आहे. व्हीआयपींच्या कार्यक्रमात बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना बसण्यासाठी खुर्च्या देण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे. याबाबत गृहमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहल्याचे पवारांनी सांगितले.
सांगलीच्या मिरजमध्ये आज (गुरुवार) गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट, शैक्षणिक संकुलाच्या रौप्यमहोत्सव सांगता सोहळा पार पडला. यावेळी पवार बोलत होते. यावेळी संकुलाच्या आवारातील सभागृहाला देण्यात आलेल्या पतंगराव कदम सभागृह व संयोगिता पाटील केंब्रीज स्कूलच्या नामकरणाचा सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. तसेच गुलाबराव पाटील ट्रस्टच्या देण्यात येणाऱ्या सामाजिक पुरस्काराचे वितरणही शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांविषयी शरद पवार यांनी काळजी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या ठिकाणी तासंतास उभे असणाऱ्या पोलिसांना बसायला खुर्ची देण्याचे बंधन कार्यक्रमाच्या आयोजकांवर घालायला हवे असे पवार म्हणाले. उपस्थित मंत्र्यांनीही याबाबत लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
तर पृथ्वीराज पाटलांचा पराभव झाला नसता
यावेळी पवारांनी गुलाबराव पाटलांच्या आठवणींना उजाळा दिला. गुलाबराव पाटील यांनी राज्यातील सहकार क्षेत्राचे नेतृत्व केले आणि सहकार चळवळ वाढवल्याचे पवार म्हणाले. नुकत्याचा झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या पराभवावरून बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीत येऊन लढली असती तर गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला नसता. काही लोकांनी हच्चा राखून काम केल्याचे पवार म्हणाले. राज्यात अनेक मतदारसंघात आमच्या कुटुंबातील किंवा आम्हीच निवडून आलो पाहिजे, अशी भावना पाहायला मिळाली. पण सांगलीत तसे झालं असेल असं वाटत नाही, असे सांगत शरद पवार यांनी वसंतदादा पाटील गटाला टोला लगावला.
कलबुर्गी, गौरी लंकेश, पानसरे यांची हत्या होत असताना विद्यार्थी शांत का?
यावेळी बोलताना काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आज देशात शिक्षण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तरी देखील अंधश्रद्धा का कमी होत नाही? हा चिंतेचा विषय आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या कलबुर्गी, गौरी लंकेश, पानसरे यांची हत्या होत असताना आजचा विद्यार्थी शांत का? हे का होत आहे? हे कळत नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच आज सगळे तरुण देशात दुःखी आहेत. शिक्षण मिळवूनही मोठ्या प्रमाणात देशात बेरोजगारी आहे. आधी या उलट परिस्थितीत होती. पण ज्या रस्त्यावर आपण चाललो आहोत, ते पाहता एक दिवस गरीब मुलांना शिक्षणापासून वांचीत राहण्याची वेळ येईल अशी चिंता खर्गेंनी व्यक्त केली. त्यामुळे ज्या शिक्षण संस्था आहेत, त्यांनी चांगल्या विचारधारेचे शिक्षक आणून विद्यार्थ्यांना समानता शिकवण्याचे काम केले पाहिजे, असे मत यावेळी खर्गेंनी व्यक्त केले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, खासदार व माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री विश्वजीत कदम, गुलाबराव पाटील ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.