सांगली : कोरोनाच्या संकटात रक्ताची नाती दुरावत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत असताना सांगलीच्या मिरजमध्ये मात्र माणुसकीचे आदर्श उदाहरण बघयाला मिळाले. येथे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारास जवळच्या नातेवाईकांनीच नकार दिल्यानंतर मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करत माणुसकीचा धर्म जपला. त्यांच्या या कृतीचे आता सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
अंत्यसंस्कारासाठी जवळच्यांचाच नकार
कोरोनाने देशभर हाहाकार माजला आहे. कुठे रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही. अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण, मृतदेह आणि कुटुंबियांना अस्पृश्यतेची वर्तणूक मिळत असल्याचेही बघायला मिळत आहे. असाच एक प्रकार कवठेमहांकाळ तालुक्यात बघायला मिळाला. तालुक्यातील राजेंद्र शिंदे यांच्या आईला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. यावेळी राजेंद्र शिंदे आणि त्यांच्या पत्नी तेजश्री शिंदे यांनी ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. पण कुठेच बेड मिळणे मुश्किल बनले होते. अखेर सांगली-मिरज रोडवरील जिल्हा क्रीडा संकुल येथील कोरोना सेंटर मध्ये बेड मिळाला. मात्र येथे उपचार सुरू असताना आठ दिवसांनी राजेंद्र शिंदे यांच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूच्या दुःखाने हतबल झालेल्या शिंदे दाम्पत्यावर आणखी मोठा डोंगर तेव्हा कोसळला, जेव्हा नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांना तिकडेच अंत्यसंस्कार उरकुन घ्या असे सांगितले.
जमियत उलेमा-ए-हिंद व मदनी चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार
गावाकडून आलेल्या निरोपामुळे शिंदे पती-पत्नीसमोर आता अंत्यसंस्कार कसे करायचा हा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत शिंदे दाम्पत्याला काय करावे हे सुचेनासे झाले होते. आपल्याला मदतीला कोण येणार, या विवंचनेत असताना, याची माहिती जमियत उलेमा-ए-हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टला मिळाली. यानंतर त्यांनी क्रीडा संकुल येथील कोरोना सेंटरवर धाव घेत अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार दर्शवला. शिंदे यांनीही याला होकार दर्शवला. यानंतर हाफीज सय्यद, सुफियान पठाण, ऍड असिफ आत्तार, सलमान शेख व पकाली यांनी कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह ताब्यात घेत स्मशानभूमीत नेऊन हिंदू पध्दतीने अंत्यसंस्कार पार पाडले. विशेष म्हणजे त्यांनी अंत्यसंस्कारासाठी एक रुपयाही शिंदेंकडून घेतला नाही. अशा प्रकारे या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत मुस्लिम धर्मातील 150 कोरोना मृतांचे दफन तर हिंदू धर्मातील 9 कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संघटनेच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.