सांगली - बांधकाम मटेरियल सप्लायर्स हत्याप्रकरणी सांगली पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी इम्रान व रफिक शेख या दोन आरोपींच्या अवघ्या आठ तासात बेड्या ठोकल्या आहेत. पूर्ववैमनस्यातुन हा खून केल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
सांगलीच्या संजयनगर नजीक शनिवारी रात्री बांधकाम मटेरियल सप्लायर व सामाजिक कार्यकर्ते सुभाष बुवा यांचा निर्घुण खून करण्यात आला होता. धारदार शस्त्रांनी एकामागून एक असे १२ वार केल्याने बुवा यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सांगली शहर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
काही दिवसांपूर्वी शेख आणि सुभाष बुवा यांच्यात वाद झाला होता. यातून सुभाष बुवा यांच्या घरासमोर उभी असलेल्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे शेख आणि बुवा यांच्यातील वाद वाढीस लागला.
यानंतर आरोपींनी शनिवारी सुभाष बुवा यांना मोबाईलवरून घरापासून काही अंतरावर असणाऱ्या सुर्यनगर येथे बोलवत त्यांच्यावर शस्त्रांनी हल्ला चढवत त्यांचा खून केला.
पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने गतीने तपास करत पहाटेच्या सुमारास सांगली नजीकच्या सूतगिरणी-कृपामय रस्त्यावर सापळा रचून दोघांना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे