सांगली - इस्लामपूर-खेड रस्त्यावर शेतात पाणी गेल्याच्या कारणावरून एकाची लोखंडी गजाने पाठीमागून डोक्यात वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. अशोक आनंदराव पाटील (वय ४५) असे मृत व्यक्तीचे नाव असून हल्लेखोर हा खून करून पसार झाला आहे.
मयत अशोक पाटील हे पाटकऱ्याचे काम करत होते. शेतातील पाण्यावरून त्यांचा खून झाल्याचे इस्लामपूर पोलिसांच्या प्राथमिक तपासात समजले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, हल्लेखोर हा भावकीतील असल्याचे समजते. इस्लामपूर पोलीसांनी आरोपीच्या शोधात पथक रवाना केले आहेत. अधिक तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत.