सांगली - जिल्ह्याच्या निगडी येथील कोरोनाबाधित माय-लेकी आता कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सांगलीचा १० वर पोहचलेला कोरोनाबाधितांचा आकडा कमी होऊन ८वर आला आहे.
'ऑरेंज झोन'मध्ये गेलेल्या सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. मुंबईहून येणाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे सापडत आहेत आणि त्यांना कोरोना लागण होत असल्याचे समोर येत आहे. शिराळा तालुक्यातील निगडी येथे एक तरुणी व तिचा भाऊ 16 एप्रिल रोजी मुंबईहून दाखल झाले होते. यापैकी तरुणीची खासगी रुग्णालयात तपासणी केली असता कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने तरुणीला मिरजेच्या आयसोलेशन कक्षात दाखल करत तिची कोरोना चाचणी घेतली असता 24 एप्रिल रोजी तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर प्रशासनाकडून गतिमान हालचाली करत निगडीतील या दोघा बहिण-भावाच्या जवळच्या संपर्कात आलेल्या १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची संस्थात्मक विलगीकरणामध्ये रवानगी करण्यात आली होती.
तसेच ज्या गाडीतून दोघांनी प्रवास केला होता, त्यांच्यावर गुन्हे दाखल करत त्यांचेही विलगीकरण केले होते. तर १२ पैकी अकरा जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, कोरोनाबाधित तरुणीच्या आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दोघी माय-लेकींवर मिरज कोरोना रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू होते. यामध्ये शुक्रवारी दोघींचे १४ दिवस पूर्ण झाल्याने त्यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित माय-लेकी आता कोरोनातून बऱ्या झाल्याची माहिती सांगली जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
दोघींना रुग्णालयातून सोडण्यात आले मात्र, घरी न पाठवता खबरदारी म्हणून आणखी १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर साळुंखे यांनी दिली. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील १०वर पोहचलेला कोरोनाबाधितांचा आकडा २ने घटून ८वर आला आहे.