सांगली - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना यंदा गणपती आणि मोहरम सण साध्या पद्धतीने साजरा करत जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ आणि पालिका क्षेत्रात ‘एक वार्ड एक गणपती’ उपक्रम प्रभावीपणे राबवावे असे, आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी केले आहे.
त्याच बरोबर उत्सव काळात कोणत्याही प्रकारच्या मिरवणूकीला परवानगी देण्यात येणार नसून कोणतेही उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करणार, असा इशाराही पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिला आहे.
यंदा गणपती उत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्र…
कोरोनाचे संकट असताना यंदा गणपती उत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेही दोन्ही सणांच्या बाबतीत सूचना जाहीर केल्या आहेत.
सांगली जिल्हा पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून दोन्ही सणांच्या बाबतीत गणपती आणि मोहरम मंडळ व सामजिक कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. गेल्या 3 वर्षांपासून गणपती आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्र येत आहेत.
गेल्या वर्षी जिल्ह्यात महापुराची सावट होते. त्यामुळे साध्या पद्धतीने दोन्ही सण साजरे झाले होते आणि यंदा कोरोनाचे महाभयंकर संकट आहे. अशा स्थितीत दोन्ही सण सर्व धर्मियांनी खबरदारी आणि साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन सांगली जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी केले आहे.
वाळवा तालुक्यातील 82 गावांकडून एक गाव एक गणपती साजरा करण्याचा निर्णय…
शासनाच्या नियमानुसार सण उत्सव साजरा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत आणि नागरिकांमधून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाळवा तालुक्यातील 82 गावांनी एक गाव एक गणपती साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर तासगाव गणपती संस्थांनकडून दरवर्षी साजरा होणारा ऐतिहासिक रथोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावाने एक गाव एक गणपती आणि पालिका क्षेत्रात एक वार्ड एक गणपती ही संकल्पना यंदा प्रभावी पणे राबवून सांगली पॅटर्न राबवून महाराष्ट्रात आदर्श निर्माण करावे. त्याच बरोबर यंदा गणेश मंडळांना गणपती बाप्पांची आराधना करण्यासाठी कोरोनाच्या युद्धात हॉस्पिटलमध्ये बेडस, व्हेंटिलेटर अशा साधन सामुग्री देऊन सहकार्य, असे आवाहनही केले आहे.
गणपती मूर्ती उंची बाबतीतही सूचना देण्यात आल्या असून उत्सव काळात कोणत्याही प्रकारच्या मिरवणूकीला परवानगी देण्यात येणार नाही. जर यामध्ये उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिला आहे.