सांगली - राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. यामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा समावेश झाला आहे. विश्वजित कदम हे पलूस-कडेगाव मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आले आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते स्वर्गीय पतंगराव कदम यांचे ते सुपुत्र आहेत, तर कदम यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून झालेल्या समावेशामुळे सांगली जिह्यातील काँग्रेसला उभारी मिळणार आहे.
एक नजर विश्वजीत कदम यांच्या जीवन परिचयावर...
नाव - डॉ. विश्वजीत पतंगराव कदम, जन्मतारीख - १३ जानेवारी १९८१, मतदारसंघ - कडेगाव-पलूस मतदारसंघ, विधानसभा सदस्य, महाराष्ट्र, शिक्षण - बीई (कॉम्प्युटर इंजिनिअरींग), एमबीए, हावर्ड विद्यापीठमधून पीएचडी
राजकीय कारकीर्द - डॉ. विश्वजीत पतंगराव कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत. ते काँग्रेस पक्षामधील सध्या तरुण फळीतील आमदार आहेत. दुष्काळग्रस्तांचे प्रश्न समजून घेण्यासाठी २०१३ साली युवक काँगेसचे प्रदेशाध्यक्ष असताना कदम यांनी ५२० किमीची पायी 'संवाद पदयात्रा' काढली होती. याच 'संवाद पदयात्रे'नंतर विश्वजीत यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर युवकांची मोठी फळी निर्माण केली.
सन २०१४ मध्ये कदम यांनी पुण्यातून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. यानंतर 9 मार्च 2018 साली पतंगराव कदम यांचे निधन झाल्यानंतर विधानसभेवर प्रथम विश्वजीत कदम बिनविरोध निवडून गेले. यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील कदम हे विक्रमी मतांनी विधानसभेत निवडून गेले.
हेही वाचा - कर्नाटक सीमेवर शिवसैनिक आणि कर्नाटक नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने
डॉ. कदम हे भारतातील मोठ्या खासगी शिक्षणसंस्थापैकी एक असलेल्या भारती विद्यापीठाच्या सचिवपदी आहेत, तर रयत शिक्षण संस्थेचे स्वीकृत सदस्यही आहेत. फुटबॉल हा त्यांचा आवडता खेळ असून वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनचे ते उपाध्यक्ष पण राहिले आहेत.
विश्वजीत कदम यांच्याबाबतीत मध्यंतरी भाजप प्रवेशाच्या मोठ्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, या सर्वांचे खंडन करत कदम यांनी आपण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे वारंवार सांगितले. त्यांच्या याच पक्षनिष्ठेचे फळ म्हणून पक्षाने विश्वजीत कदम यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.
हेही वाचा - थकीत मजुरीसाठी हमाल तोलाईदारांचा बाजार समितीवर हल्लाबोल