सांगली - लोकसभा निवडणुकीत तब्बल ४० हजार मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याप्रकरणी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज जिल्हाधिकाऱयांची भेट घेतली. तसेच त्यांच्याकडे यासंदर्भात तपास करण्याची मागणी केली. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
सांगली लोकसभेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले. ६५.६८ टक्के इतके मतदान या मतदारसंघात झाले आहे. मात्र या मतदानादरम्यान अनेक मतदारांची नावे गायब असल्याचा प्रकार समोर आला.आणि सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल ४० हजार मतदारांचे नावे यंदाच्या लोकसभा मतदार यादीतून गायब असल्याचे समोर आले. यामुळे एकच खळबळ उ़डाली आहे. या प्रकारामुळे हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते.
या प्रकरणी अनेक सामाजिक, राजकीय पक्षांनी याबाबत आक्षेप नोंदवला आहे. तर आज सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मतदारांची नावे गायब झाल्याप्रकरणी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन याप्रकरणी तपासणी करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. यावर, मतदार यादीतील नावे गायब झाल्याप्रकरणी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत जिल्हा निवडणूक शाखेला मतदारांची नावे गायब झाल्याप्रकरणी सूचना करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर यासंदर्भात सखोल चौकशी करणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.