सांगली - जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशावरून काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीकाँग्रेस टीका केली आहे. आघाडीत बिघाडी नको आहे, मात्र राष्ट्रवादीकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष प्रवेश सुरू असल्याचा आरोप आमदार कदम यांनी केला आहे, ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील काँग्रेस संचालकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सांगली महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातल्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हे सर्व पक्ष प्रवेश सोहळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहेत. मात्र, या पक्षप्रवेशावरून काँग्रेसने राष्ट्रवादीवर टीका केली आहे. काँग्रेसचे आमदार व जिल्हा अध्यक्ष मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेश सोहळ्यावर निशाणा साधला आहे. राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे आणि सत्तेत येत असताना एकमेकांची कार्यकर्ते फोडायचे नाही,असे ठरले होते.
मात्र, सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा पार पाडत आहे आणि काँग्रेस कार्यकर्ते, नेत्यांना प्रवेश दिला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेस कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश सोहळे अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहेत, असा आरोप करत आघाडी धर्मात बिघाडी झाली नाही पाहिजे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश सोहळे होत आहेत, अशी टीका आमदार कदम यांनी करत आघाडी धर्माची नियमावली धुडकावून आप-आपल्या सहकारी पक्षाचे कार्यकर्ते फोडणे कितपत योग्य आहे, असा सवाल आमदार मोहनराव कदम यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार रद्द, तिसऱ्यांदा पडला खंड..