सांगली - बैलगाडी शर्यत होऊ नये यासाठी सरकार कामाला लागली आहे. पण, कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत होणार असा एल्गार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
20 ऑगस्ट रोजी बैलगाडी शर्यत जाहीर केली आहे तर दुसर्या बाजूला प्रशासनाने बैलगाडी शर्यत रोखण्यासाठी मोठी तयारी केली आहे. पण, कोणत्याही परिस्थितीत शर्यत होणारच, असा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण..?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीवरून वातावरण तापले आहे. सांगली जिल्ह्यातील मोठा पोलीस फौजफाटा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या झरे (ता. आटपाडी) या गावी तळ ठोकून आहे. नऊ गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आमदार पडळकर यांनी शर्यतीसाठी तयार केलेले मैदान पोलिसांनी जेसीबी लावून उकरून टाकले आहे. शिवाय, कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत होऊ देणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. तर ठरलेल्या दिवशी (20 ऑगस्ट) बैलगाडी शर्यत होणारच, अशी ठाम भूमिका आमदार पडळकर यांनी घेतली आहे. त्यामुळे आता शुक्रवारी बैलगाड्यांच्या शर्यती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कत्तलीसाठी गोवंश जाऊ नये म्हणून शर्यत महत्त्वाची
आटपाडीच्या झरे या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 ऑगस्टला बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. यासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे पहिले बक्षीसही जाहीर केले आहे. राज्यात बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी, यासाठी पडळकर यांनी या शर्यतीचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांची खिलार गाय आणि गोवंशाला शर्यती सुरू असताना लाखोंची किंमत मिळत होती. मात्र, शर्यती बंद झाल्यापासून दहा-बारा हजारांत विक्री करावी लागत आहे. त्यामुळे कत्तलीसाठी हे गोवंश अनेकजण खरेदी करतात. ते होऊ नये यासाठीच छकडा-बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे आमदार पडळकर म्हणाले.
हेही वाचा - सांगलीचा पूर लागला ओसरू.. आता 'मिशन शहर स्वच्छ', सांगलीसह 5 पालिकांची स्वछता पथके ऑन फिल्ड