सांगली : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी केलेल्या टिकेवरून आमदार अनिल बाबर यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. आता संजय राऊत यांच्याकडे दुसरे काही राहिले नाही. त्यामुळे जपमाळ घेऊन त्यांनी शिवसेना म्हणत राहावे, अशी टीका देखील अनिल बाबर यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. शिवसेना कोणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. त्यावरही अनिल बाबर यांनी मत व्यक्त केले.
शिवसेना नाव, चिन्ह एकनाथ शिंदे यांचे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देताना शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांचे असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सांगलीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून जल्लोष साजरा करण्यात आला. शिंदे गटाचे शहर अध्यक्ष महेंद्र चांडाळ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवाजी मंडई रोडवर जल्लोष साजरा करण्यात आला. ढोल ताशे, फटाक्यांची आतषबाजी करत यावेळी शिंदे गटाकडून मिठाई वाटप करण्यात आली. आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने देण्यात आलेला निकाल हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणाऱ्यांचा विजय असल्याचे मत यावेळी अनिल बाबर यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत : शिवसेना शिंदे गटाचे विटा-खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी बोलताना आमदार अनिल बाबर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनाला अपेक्षित असलेला आणि आनंदाचा असा निकाल आला आहे. जे आमच्यावर टीका करत होते, त्याला नितीने उत्तर दिले आहे. पण निकालानंतरही काही लोक आम्हाला शिव्या घालत आहेत. पण त्यांना सगळ्यांनी कायद्याने व लोकशाही मार्गाने उत्तर दिले आहे. त्यामुळे आता आम्ही गद्दार ,असे म्हणायचे कारण नाही.
गुवाहाटीची कामाख्या देवी पावली : दुसरी गोष्ट अशी की, मी अंधश्रद्धेने सांगत नाही, पण श्रद्धेनं सांगतो, आम्हाला गुवाहाटीची कामाख्या देवी पावली. काही लोकांनी देवीला शिव्या दिल्या आणि आम्हाला रेडे म्हटले, हे देवीला सुद्धा मानवले नाही. परमेश्वरला सुद्धा वाटले आमच्यावर अन्याय होतोय आणि नितिने चांगल्या प्रकारे निर्णय दिला. आता हे सर्व लोक जागे झाले आहेत. लोकांचे प्रश्न व समाजसेवा दिसायला लागली. आता बाहेर पडायला लागले आहेत. आम्ही सत्ता तुम्हालाचं मिळवून दिली होती. आम्ही कोणी विरोध केला नव्हता. महाविकास आघाडी असो की मुख्यमंत्री आणि मंत्री कोणाला करायचे. आम्हाला पक्षांतर बंदी कायदा आणि गद्दार सांगतात. पण जनता आमची मालक मतदार जनता आहे, असे यावेळी आमदार अनिल बाबर यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : Mukesh Ambani Visited Somnath : मुकेश-आकाश अंबानी यांनी घेतले सोमनाथाचे दर्शन, दिले १.५१ कोटींचे दान